बँकांसमोरील गर्दीचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST2021-05-04T04:08:17+5:302021-05-04T04:08:17+5:30
परभणी : बँकांसमोर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम असल्याची बाब ...

बँकांसमोरील गर्दीचे करायचे काय?
परभणी : बँकांसमोर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम असल्याची बाब सोमवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.
प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखे दरम्यान गर्दी अधिक असते. खात्यावर जमा झालेले अनुदान, शिष्यवृत्तीची रक्कम तसेच नवीन खाते उघडणे अशा विविध कारणांसाठी ग्राहक बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांसमोर भल्यामोठ्या रांगा लागल्याचे सोमवारी दिसून आले. विशेष म्हणजे, बँक प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उपाय केले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांकडून त्याचे पालन होत नाही. बँकांच्या मुख्य गेटसमोर ग्राहक गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश बँकांच्या परिसरात पुरेशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेत ग्राहकांना रांग लावून व्यवहार करावे लागत आहेत. येथील वसमत रस्त्यावरील बडोदा बँकेसमोर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. बँकांमध्ये ४ ते ५ ग्राहकांनाच टप्प्याटप्प्याने प्रवेश दिला जातो. परंतु बँकेच्या बाहेर ग्राहकांची गर्दी कायम आहे. ही बाब लक्षात घेता आता ग्राहकांनी जागरूक होऊन फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
बडोदा बँक
वसमत रस्त्यावरील बडोदा बँकेच्या समोर ग्राहकांची मोठी रांग लागलेली होती. सुरक्षारक्षक ग्राहकांना पाहून फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करीत होता. परंतु काम लवकर व्हावे, यासाठी ग्राहकच गर्दी करून उभे ठाकल्याची बाब दिसून आली.
युनियन बँक
वसमत रस्त्यावर असलेल्या युनियन बँकेसमोरही ग्राहकांची मोठी गर्दी होती. विशेष म्हणजे, बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून टप्प्याटप्प्याने ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जात होता. परंतु बँकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर मात्र ग्राहक गर्दी करून असल्याचे दिसून आले. ही गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या.
बँकेतील बचत खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी आलो आहे. मागील काही दिवसांपासून खात्यात पैसे टाकण्याची नियोजन होते. गर्दीमुळे टाळत होतो. परंतु आज काम करणे आवश्यक असल्याने या ठिकाणी रांगेत उभा आहे.
महिला बचत गटाच्या खात्यासंदर्भात बँकेत काम असल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे. बचत गटाचे पैसे भरणे आवश्यक असून, खाते अपडेट करण्यासाठी येथे आले आहे.
बँकेत ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. टप्प्याटप्प्याने ५-५ खातेदारांना आत प्रवेश दिला जात आहे. बँकेच्या बाहेरही लागलेली रांग कमी करण्यासाठी व फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले जाते. तसेच सुरक्षारक्षकही नियुक्त केला आहे.
शिवाजी कदम, बँक अधिकारी