भिज पावसाने पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST2021-06-29T04:13:35+5:302021-06-29T04:13:35+5:30
यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील जून महिन्याच्या सुरुवातीलाच पेरण्याची तयारी केली. ...

भिज पावसाने पिकांना जीवदान
यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनीदेखील जून महिन्याच्या सुरुवातीलाच पेरण्याची तयारी केली. मृग नक्षत्रात जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस गायब झाला. पिके अंकुरल्यानंतर पावसाची आवश्यकता होती. मात्र पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी पेरण्यांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत.
रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा उंचावल्या. रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर भीज पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कोमेजून जात असलेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी पेरण्यांसाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
सरासरी २५ मि.मी. पाऊस
रविवारी रात्रभर झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी २५ मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात १३.९, गंगाखेड ३०.२, पाथरी २४.९, जिंतूर २१.५, पूर्णा ३२.९, पालम ३८.२, सेलू १६.१, सोनपेठ २९.३ आणि मानवत तालुक्यात २७.९ मि.मी. पाऊस झाला आहे.
१७५ टक्के अधिक पाऊस
जून महिन्यात जिल्ह्यात १३५.६ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत २३८.४ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत आतापर्यंत १७५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ३०७.७ मि.मी. पाऊस झाला असून, सेलू तालुक्यात सर्वात कमी २०३.४ मि.मी. पाऊस झाला आहे.