मंगल कार्यालयाऐवजी शेतातच लग्नाचे बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST2021-04-25T04:16:55+5:302021-04-25T04:16:55+5:30
मागील सहा महिन्यांच्या काळात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाथरी तालुक्यात निर्माण झाले होते. त्यामुळे पूर्वीसारखे व्यवहार सुरू ...

मंगल कार्यालयाऐवजी शेतातच लग्नाचे बार
मागील सहा महिन्यांच्या काळात कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाथरी तालुक्यात निर्माण झाले होते. त्यामुळे पूर्वीसारखे व्यवहार सुरू झाले. थाटात लग्न सोहळ्याचे आयोजनही करण्यात येऊ लागले. दोन ते तीन हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडल्याचे दिसून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने संचारबंदी जाहीर केले आहे. परिणामी धार्मिक विधी, पूजा, समारंभ आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्यावतीने केवळ २५ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लग्न लावण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून लग्नासाठी बाशिंग बांधलेल्या इच्छुक वर-वधूंची चांगलीच पंचाईत झाली. सद्यस्थितीत संचारबंदीमुळे रस्त्यावर फिरण्यासही बंदी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मंगल कार्यालयाऐवजी शेत आखाडाच्या ठिकाणी मंडप टाकून लग्न लावण्यात येत आहेत. आता लग्ने उरकून घेण्यात येऊ लागली आहेत. मात्र, असे असले तरी शेतातील लग्नालाही शंभर ते दोनशे वऱ्हाडी मंडळी एकत्र जमू लागले आहेत. याकडेही तालुका प्रशासनाने लक्ष देऊन कोरोनाचा धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.