तीन रुपये किलोने विक्री करावे लागले टरबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:31+5:302021-05-13T04:17:31+5:30
परभणी : टरबुजाची शेती करून दरवर्षी उत्पन्न मिळवणाऱ्या तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याला यावर्षी मात्र तब्बल दीड लाख रुपयांचा फटका ...

तीन रुपये किलोने विक्री करावे लागले टरबूज
परभणी : टरबुजाची शेती करून दरवर्षी उत्पन्न मिळवणाऱ्या तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याला यावर्षी मात्र तब्बल दीड लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. संचारबंदीमुळे बाजारपेठेत उठाव नसल्याने तीन रुपये किलो दराने टरबुजाची विक्री केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
तालुक्यातील पाथरा येथील सय्यद समंदर सय्यद छोटू हे दरवर्षी टरबुजाची लागवड करतात. पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोगशीलता अवलंबत टरबूज शेतीतून त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी उत्पन्न मिळविले आहे. मात्र यावर्षी टरबुजांचे उत्पादन बाजारात येण्यापूर्वी कोरोनाची साथ धडकली. वाढलेल्या संसर्गामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे. परिणामी जिल्हाभरातील बाजारपेठ ठप्प आहे. उन्हाळ्यात टरबुजांना मागणी वाढते; परंतु या वर्षी बाजारपेठच उपलब्ध नसल्याने टरबुजांचे भाव गडगडले. परिणामी सय्यद समंदर यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. टरबुजांना भाव मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील बाजारपेठेत ३ रुपये किलो या दराने टरबुजांची विक्री केली. त्यामुळे या संपूर्ण हंगामातून टरबूज शेतीवर केलेला खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. सुमारे दीड लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला, असे सय्यद समंदर यांनी सांगितले.
पाच एकरमध्ये लागवड
पाथरा येथील शेतकरी सय्यद समंदर यांनी पाच एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली होती. यासाठी तीन महिन्यांपूर्वी केलेला खर्चही निघालेला नाही. सर्वसाधारणपणे ८ ते ९ रुपये किलो दराने विक्री होणारे टरबूज यंदा मात्र तीन रुपये किलो दराने विक्री करावी लागले. त्यामुळे टरबूज शेती यावर्षी तोट्यात राहिली आहे.