परभणी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने लोअर दुधना प्रकल्पातून परभणी तालुक्यासाठी नदीपात्रातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेने सातत्याने आ. डॉ. राहुल पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने आ. डॉ.राहुल पाटील यांनी १९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशीही याबाबत बैठक घेऊन लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रातून सोडण्याची मागणी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नी सकारात्मकता दर्शवित येत्या एक-दोन दिवसात लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रातून सोडण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे तालुक्यातील नांदापूर,सावंगी, मटकऱ्हाळा, मांडवा, सनपुरी, हिंगला, वाडी दमई, संबर, साबा, मुरंबा आदी ३० गावातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस आ. डॉ. राहुल पाटील यांच्या सह नांदापूरचे सरपंच शरद रसाळ, उपसरपंच रामप्रसाद चांदणे, सरपंच संजय शिंदे, सरपंच माऊली अब्दगिरे, कुंडलिक पांढरे, माऊली खिस्ते आदी उपस्थित होते.
निम्न दुधनातून सोडणार लवकरच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST