हिवाळ्यातही आढळले पाण्याचे नमुने दूषित
By Admin | Updated: December 22, 2014 15:09 IST2014-12-22T15:08:26+5:302014-12-22T15:09:26+5:30
आरोग्य विभागाने घेतलेल्या पाणी नमुन्यात १९ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळ्यात देखील तालुक्यातील पाणी दूषित असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे.

हिवाळ्यातही आढळले पाण्याचे नमुने दूषित
परभणी : आरोग्य विभागाने घेतलेल्या पाणी नमुन्यात १९ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळ्यात देखील तालुक्यातील पाणी दूषित असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्यामध्ये तालुक्यातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची शुद्धता तपासली जाते. परभणी तालुका आरोग्य विभागाने नोव्हेंबर महिन्यात तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांतर्गत २९४ पाण्याचे नमुने तपासले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत या पाणी नमुन्यांची तपासणी झाली असून त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यानुसार १९ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैठणा आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक दूषित नमुने आढळले तर पेडगाव आरोग्य केंद्रांतर्गत सर्वात कमी म्हणजे २ टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ३४ गावांमधील हे पाणीनमुने दूषित आहेत.
जास्तीत जास्त साथीचे आजार पाण्याद्वारेच फैलावतात. दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून आरोग्य विभागाला या संदर्भात वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. तालुका आरोग्य विभागाने एकूण २९४ पाणीनमुने तपासले. त्यामध्ये ५६ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. त्याची टक्केवारी १९ एवढी येते. /(प्रतिनिधी)
या गावात आढळले दूषित पाणीस्त्रोत
> जांब प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागापूर, उजळंबा, झरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत टाकळी बोबडे, साडेगाव, झरी, डिग्रस, पिंगळी, कोथाळा, देवठाणा, मांगणगाव, हिंगला, पेडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शहापूर, दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ठोळा, साळापुरी, ताडपांगरी, ब्रह्मपुरी, लालतांडा, पेगरगव्हाण, आंबेटाकळी, पोखर्णी, सुरपिंपरी, वाकडी तांडा, कैलास वाडी, वाकडी, दैठणा, इठलापूर, सिंगणापूर, पिंगळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मिरखेल, पिंगळी, ताडलिमला, लोहगाव, वांगी, पाथरा, तट्टजवळा, उखळद. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. परंतु, हिवाळ्यातच दूषित नमुने आढळले.