पाथरी (विठ्ठल भिसे)- एका महिन्याची पंढरीची वारी पूर्ण करुन, विठ्ठलनाम गात तल्लीनतेने पायी चालत घरात परतलेल्या शेतकऱ्याला मृत्यू आलिंगन देईल, हे कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते...पण नियतीचा खेळ वेगळाच ठरला. पायी पंढरीची वारी पूर्ण करुन घरात परतलेल्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार(दि.११ जुलै) सकाळी ७ वाजता पाथगव्हाण बु. शिवारात घडली.
पंढरपूर वारीतून परतलेले शेतकरी प्रल्हाद गोपाळ घांडगे(वय ४०) हे आपल्या बैलजोडीसह शेतात पाळी घालत असताना लोखंडी जुवाला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने जागीच ठार झाले. या दुर्दैवी घटनेत त्यांच्यासोबत असलेले दोन्ही बैलही जागीच मृत्यूमुखी पडले. यावेळी प्रल्हाद यांचे भाऊ विकास घाडगे(वय ३२) पाठीमागे खत पेरणी करत होते. सुदैवाने ते बालबाल बचावले.
वारी संपली, पण विठ्ठलभक्त कायमचा गेला...पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील वारकऱ्यांची पायी दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते. गावातील प्रल्हाद घांडगे हे मागील काही वर्षांपासून पंढरपूर वारी नित्यनेमाने करायचे. यंदाही ते गावकऱ्यांसोबत पायी पंढरपूरला गेले. महिनाभर वारीत असल्याने वारीतून परत येताच शेतात रखडलेली कामे पूर्ण करण्याचा बेत आखला. आज सकाळी ते आपल्या भावासोबत शेतातील कापसाला खत देण्याच्या कामाला लागले.
पेरणी करत असताना ते औत हाणत होते, तर भाऊ खताची पेरणी करत होता. यादरम्यान, औताच्या लोखंडी जुवा उघड्या विजेच्या तारेला लागला. यामुळे दोन्ही बैल आणि प्रल्हाद घंडगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर भाऊ मात्र या अपघातात बालबाल बचावला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, विठ्ठलभक्त गेला अशी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रल्हाद घंडगे यांना 16 वर्षाचा एक मुलगा असून, प्रल्हाद यांच्या निधनाने कुटुंब वाऱ्यावर पडले आहे.