व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांत वाढली मुलांची गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:50+5:302021-09-10T04:24:50+5:30
मागील महिन्यात डेंग्यूसदृश तापीची साथ जिल्हाभरात पसरली होती. शहरासह ग्रामीण भागातही घरोघरी तापीचे रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांमध्ये मुलांचे ...

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांत वाढली मुलांची गर्दी!
मागील महिन्यात डेंग्यूसदृश तापीची साथ जिल्हाभरात पसरली होती. शहरासह ग्रामीण भागातही घरोघरी तापीचे रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीला जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ही साथ फैलावत असून, नागरिकांना परिसर स्वच्छता तसेच डास निर्मूलनासाठी स्वत:हून प्रयत्न करण्याची गरज आहे.
ही घ्या काळजी
दरवर्षी पावसाळ्यात तापीची साथ फैलावते. नागरिकांनी या काळात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच डासांपासून संरक्षण करणाऱ्या उपकरणांचा वापर करावा. झोपताना मच्छरदाणी वापरावी, तसेच घरासमोरील नाल्या वाहत्या करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट वाढले
मागील महिनाभरापासून नागरिक तापीच्या साथीने त्रस्त आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी डेंग्यू आणि डेंग्यूसदृश तापीने जिल्हावासीयांची डोकेदुखी वाढविली आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये तापीची साथ पसरली आहे. विशेषत: मुलांमध्ये संसर्ग अधिक असल्याचे जाणवते. ही तापीची साथ डासांपासून फैलावते. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यावर राहतात. तसेच सायंकाळच्या वेळी या डासांचे प्रमाण अधिक असते. तेव्हा नागरिकांनी स्वच्छता राखावी. डासांपासून बचाव करावा. बाहेरचे अन्न खाऊ नये. तसेच तापीसारखी लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. या काळामध्ये रुग्णांनी जास्तीत जास्त आराम करणे आवश्यक आहे.
-डॉ. विशाल पवार, बालरोग विभागप्रमुख