लसीकरण उत्सवात लसीचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:14+5:302021-04-14T04:16:14+5:30
परभणी : जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लसीकरण उत्सवात लसीचा खोडा निर्माण झाला ...

लसीकरण उत्सवात लसीचा खोडा
परभणी : जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लसीकरण उत्सवात लसीचा खोडा निर्माण झाला आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल या काळात लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील लसीचा साठा संपुष्टात आला. परिणामी रविवारी जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. सोमवारी सकाळी जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे १७ हजार डोसेस उपलब्ध झाले आणि लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र कोव्हॅक्सिन या लसीचा साठा उपलब्ध झाला नाही. अनेक नागरिकांनी यापूर्वीही कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. कोव्हॅक्सिनचा साठा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने या नागरिकांना दुसरा डोस घेता आला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोविशिल्डची लस उपलब्ध झाल्याने अनेक नागरिकांनी ही लस घेतली; परंतु कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध नसल्याने अनेकांना लसीकरण करता आले नाही.
दोन हजार नागरिकांनी घेतली लस
परभणी जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी कोविशिल्ड लस उपलब्ध झाल्यानंतर ती जिल्ह्यात विविध केंद्रांवर वितरित करण्यात आली. १२ एप्रिल रोजी दिवसभरात २ हजार २०८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यात १०१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार १६४ नागरिकांना लसीकरण झाले आहे.