तिसऱ्या लाटेच्या धास्तीने वाढले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:58+5:302021-06-28T04:13:58+5:30
परभणी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात असून, त्याचा परिणाम कोरोना लसीकरणावर झाला आहे. मागच्या ...

तिसऱ्या लाटेच्या धास्तीने वाढले लसीकरण
परभणी : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात असून, त्याचा परिणाम कोरोना लसीकरणावर झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून लसीकरणासाठी नागरिक पुढे येत असून, दररोज सात ते आठ हजार नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात होत आहे.
कोरोनावर कोणतेही औषध नाही. लसीकरण हाच पर्याय आहे, याविषयी वारंवार जनजागृती करण्यात आली. मात्र तरीही नागरिक फारसे गांभीर्याने घेत नव्हते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. शहरातील प्रत्येक केंद्रावर दिलेले प्रत्येकी ५० डोसचेही लसीकरण पूर्ण होत नव्हते. लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याने आरोग्य विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे यासाठी गावा-गावांत लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करून लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र तरीही लसीकरणाचा वेग वाढत नव्हता.
मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तरीही नागरिक फारसे लसीकरणासाठी घराबाहेर पडत नव्हते. मात्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. तिसरी लाट येऊ शकते, याविषयी नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत डेल्टा प्लस हा कोरोनाचा विषाणू आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही नागरिकांनी धास्ती घेतली असून, लसीकरणासाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.
कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत रोज केवळ अडीच ते तीन हजार नागरिकांचेच जिल्ह्यात लसीकरण होत होते. ही संख्या आता मागच्या चार दिवसांपासून ८ ते १० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग जिल्ह्यात वाढला असून, शहरी आणि ग्रामीण भागांतही लसीकरणासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.
शुक्रवारी विक्रमी लसीकरण
कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासन लसीकरणावर भर देत असले तरी कधी लसीच्या तुटवड्यामुळे, तर कधी ऑनलाईन नोंदणीतील अडचणींमुळे लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आतापर्यंत एका दिवसात सहा ते सात हजार नागरिकांचेच लसीकरण करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र मागील चार दिवसांत हे लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले. शुक्रवारी (दि. २५) एका दिवसात ११ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. ही संख्या आतापर्यंतच्या लसीकरणातील सर्वाधिक ठरली आहे.
ग्रामीण भागात जनजागृतीवर भर
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी ग्रामीण भागात लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे प्रत्येक गावात जाऊन लसीकरणाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचाही परिणाम लसीकरण वाढण्यासाठी झाला आहे. लसीकरणासाठी नागरिक आता गर्दी करू लागले आहेत.
२३ जून : १०२१४
२४ जून : ८१६८
२५ जून : ११७२१
२६ जून : ९७२०