माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:12+5:302021-05-18T04:18:12+5:30
परभणी : लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण ठप्प असताना, दुसरीकडे जनावरांसाठीही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ...

माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचे लटकले
परभणी : लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण ठप्प असताना, दुसरीकडे जनावरांसाठीही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प आहे.
जनावरांना साथीचे आजार होऊ नयेत, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर आणि मे महिन्यामध्ये लाळ खुरकूत या संसर्गजन्य आजाराचे लसीकरण केले जाते. एफएमडी नावाची ही लस जिल्ह्याला दरवर्षी मे महिन्यात उपलब्ध होते. मात्र, या वर्षी अद्यापपर्यंत लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जनावरांचे लसीकरण ठप्प आहे. एकीकडे कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी दिली जाणारी लस जिल्ह्यात उपलब्ध नसताना, हीच परिस्थिती जनावरांसाठीही निर्माण झाली आहे. जनावरांच्या लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने ३ लाख ५९ हजार डोसची मागणी नोंदविली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लस उपलब्ध होईल. त्यानंतर, लसीकरण सुरू केले जाईल, असे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
लाळ खुरकूतसह इतरही लसीकरण
साथ आजारापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या लसी दिल्या जातात. त्यात लाळ खुरकूत या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी एफएमडी ही लस दिली जाते, तर घटसर्प, फऱ्या, आम्रविषार या लसीचेही लसीकरण केले जाते. मागील वर्षी जनावरांमध्ये लम्पिस्किन या साथीच्या आजाराचा फैलाव झाला होता. त्यामुळे या वर्षी लंपिस्किनसाठी दिली जाणारी गोटपॉक्स या लसीचीही मागणी करण्यात आली आहे.
संसर्ग वाढण्याची भीती नाही
लाळ खुरकूत या आजाराचा संसर्ग साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पसरतो. थंडीच्या काळात जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. मे महिन्यात मात्र तसा धोका नाही. त्यामुळे उशिराने लस मिळाली, तरी जनावरांना संसर्ग होण्याची भीती नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाळ खुरकूतचे लसीकरण झाले आहे. मे महिन्यात लसीकरण होणे अपेक्षित होते. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्याला लस उपलब्ध होईल. त्यानंतर, जिल्हाभरात लसीकरण सुरू केले जाणार आहे.
राजेसाब कल्यापुरे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग
मे महिन्यात लाळ खुरकूत लसीकरण केले जात असल्याने, महिनाभरापासून या लसीची प्रतीक्षा करीत आहे. अद्यापपर्यंत जनावरांना लस मिळाली नाही.
नियमितपणे पशुधनाला लसीकरण केले जाते. मागील वर्षी लाल खुरकूतची लस दिली आहे. या वर्षीची लस घेणे शिल्लक असून, लसीची प्रतीक्षा करीत आहे.