लस घेणारे केंद्रावर, मात्र नोंदणी करणारे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:52+5:302021-06-26T04:13:52+5:30
परभणी शहरात १२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यामध्ये अनेक ठिकाणी लसीकरणाच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण ...

लस घेणारे केंद्रावर, मात्र नोंदणी करणारे गायब
परभणी शहरात १२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यामध्ये अनेक ठिकाणी लसीकरणाच्या प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत आहे. जायकवाडी येथील केंद्रावर लसीकरण करण्यापूर्वी संगणक ऑपरेटरकडून नोंदणी केली जाते. शुक्रवारी दुपारी १.३०च्या सुमारास या केंद्रावरील ऑपरेटर काही वेळ जेवणासाठी गेले होते. यामुळे नागरिक त्यांची वाट पाहत बसले. बराच वेळानंतरही ऑपरेटर न परतल्याने नागरिक वैतागले. त्यांनी केंद्र परिसरात अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली. मात्र, नोंदणीचे काम सुरूच आहे आणि लसही दिली जात आहे, असे सांगितले. यावेळी ३० ते ४० जण येथे दुपारी ३.३० वाजेपर्यंत ताटकळत बसले होते. यानंतर लसीकरण सुरू झाले. मात्र याबाबत मनपा आरोग्य विभागाने असे काही घडलेच नाही असे म्हणत झालेल्या प्रकारावर पडदा टाकला. काही जणांनी मनपा आयुक्त देवीदास पवार यांनाही लसीकरण ठप्प पडल्याची माहिती फोनवरून सांगितली. त्यानंतर संबंधित कर्मचारी केंद्रावर आल्याचे ताटकळत बसलेल्या नागरिकांनी सांगितले.
लस मिळतेय उशिराने
बाल विद्यामंदिर येथील केंद्रावर दररोज लस उशिराने मिळत आहे. यामुळे सकाळी ११ वाजता लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना किमान अर्धा तास तसेच ताटकळत बसावे लागत आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीसुध्दा असाच प्रकार घडला.
ऑफलाइन-ऑनलाइन नोंदणीचा घोळ
शुक्रवारी लसीकरण करण्यासाठी आलेल्या अनेकांनी गुरुवारी लसीकरणाच्या वेबसाइटवर ऑनलाइन पध्दतीने नोंदणी केली होती. मात्र, ही ऑनलाइन नोंदणी शुक्रवारी दुपारी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्यावर अडचणीची ठरली. तांत्रिक अडचणीमुळे काही जणांची पूर्वीची नोंदणी रद्द करून नव्याने ऑफलाइन पध्दतीने टोकन घेत मोबाइलवर पुन्हा नोंदणी करावी लागल्याचे प्रकार घडले आहेत.