सोमवारपासून ५ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:12+5:302021-02-05T06:06:12+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासनाने एक केंद्र वाढविले असून सोमवारपासून आता ५ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाच्या ...

सोमवारपासून ५ केंद्रांवर लसीकरण
परभणी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासनाने एक केंद्र वाढविले असून सोमवारपासून आता ५ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.
कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने जिल्हाभरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मागील वर्षी मार्च ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे कोरोनावर लस केव्हा येते, याची प्रतीक्षा लागली होती. जिल्ह्यात ही लस आता उपलब्ध झाली आहे. १५ जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचे ९ हजार ३३० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविन या ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लसीकरण केले जात आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत २, जिल्हा आरोग्य अधिकारी अंतर्गत १ आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत १ अशा चार केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर १०० या प्रमाणे ४०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आरोग्य विभागाने आता एक केंद्र वाढविले आहे. तसेच एका केंद्रामध्ये बदल केला आहे.
२५ जानेवारीपासून पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. पूर्णा येथे तालुकास्तरावर लस उपलब्ध करण्यात आली असून येथील डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केंद्र बंद करण्यात आले असून त्याऐवजी पिंगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारपासून लसीकरण केले जाणार आहे.
नगराध्यक्षांच्या उपस्थितीत प्रारंभ
पूर्णा येथे सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजेपासून लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. दिवसभरात १०० लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे.
१ हजार ३२२ लाभार्थ्यांनी घेतली लस
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला असून आतापर्यंत १ हजार ३२२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. लस घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये १ हजार ७ महिला आणि ३१५ पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.