१५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीचशे कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:56+5:302021-02-09T04:19:56+5:30
परभणी : येथील कापूस पणन महासंघाने हमी भावाने कापूस खरेदी केला असून, या कापसाच्या पेमेंटपोटी १४ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ...

१५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीचशे कोटी
परभणी : येथील कापूस पणन महासंघाने हमी भावाने कापूस खरेदी केला असून, या कापसाच्या पेमेंटपोटी १४ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २४८ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४६ रुपये जमा केले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील कापूस हमी दराने खरेदी करण्यासाठी कापूस पणन महासंघाने परभणी, गंगाखेड, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यांतील करम येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. ८ फेब्रुवारीपर्यंत पणन महासंघाने ४ लाख ८२ हजार १५२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या कापूस उत्पादकांना ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल या दराने रक्कम अदा करण्यात आली आहे. आतापर्यंत १४ हजार ७६१ शेतकऱ्यांना २४८ कोटी ६७ लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. परभणी केंद्रावरील ३ हजार ९९८ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३५ हजार ३५६ रुपये, गंगाखेड केंद्रावरील ७ हजार ३५६ शेतकऱ्यांना १२८ कोटी ७७ लाख ३० हजार ८८८ रुपये, पाथरी केंद्रावरील २ हजार ७८७ शेतकऱ्यांना ४१ कोटी ३८ लाख २२ हजार २९ रुपये, तर सोनपेठ तालुक्यातील करम येथील ६२० शेतकऱ्यांच्या खात्यावर १० कोटी ५१ लाख ४९ हजार ५७३ रुपये अदा करण्यात आले आहेत.
साडेपंधरा हजार शेतकऱ्यांचा कापूस
कापूस पणन महासंघाने चार ठिकाणच्या केंद्रांवर १५ हजार ६८६ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला होता. त्यात परभणी केंद्रावर ४ हजार ८४३, गंगाखेड येथील केंद्रावर ७ हजार ४०५, पाथरी केंद्रावर २ हजार ८०७ आणि करम येथील केंद्रावर ६३१ शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला आहे.
आवक घटल्याने तीन केंद्र बंद
जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे पणन महासंघाने गंगाखेड, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यांतील करम येथील केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असताना कापूस विक्री करणे शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांना परभणी केंद्रावर कापूस विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पेमेंट शिल्लक राहिलेले शेतकरी
परभणी : ८४५
गंगाखेड : ४९
पाथरी : २०
करम : ११
एकूण ९२५