आडगाव येथे दोन बालकांचा गुदमरून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:48+5:302021-07-25T04:16:48+5:30
पालम (जि. परभणी) : पोत्यात साठवून ठेवलेल्या हळदीला कीड लागू नये म्हणून टाकलेल्या कीडनाशक गोळ्यांचा वायू पसरून दोन बालकांचा ...

आडगाव येथे दोन बालकांचा गुदमरून मृत्यू
पालम (जि. परभणी) : पोत्यात साठवून ठेवलेल्या हळदीला कीड लागू नये म्हणून टाकलेल्या कीडनाशक गोळ्यांचा वायू पसरून दोन बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना २३ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. तर याच घटनेत पती-पत्नी गंभीर असून, त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील आडगाव येथे एका शेतातील खोलीत हळदीचे पीक काढून ठेवले होते. हळद वाळवून पोत्याची थप्पी लावली होती. या काढलेल्या हळदीला कीड लागू नये यासाठी प्रत्येक पोत्यामध्ये कीडनाशक गोळ्या टाकण्यात आल्या होत्या. या खोलीच्या शेजारी शेतमजूर भीमाशंकर कुगणे हे परिवारासह राहत होते. २३ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास या कीडनाशक गोळ्यांचा वायू खोलीत पसरला. हळद ठेवलेल्या खोलीच्या शेजारी राहणाऱ्या खोलीतही हा वायू पसरत गेला. त्यामुळे भीमाशंकर कुगणे, त्यांची पत्नी आणि मुलगी ज्योती भीमाशंकर कुगणे (दीड वर्ष), कन्हैया भीमाशंकर कुगणे (४ वर्षे) या चौघांनाही श्वास घेण्यास त्रास होत होता. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही माहिती समजल्यानंतर चौघांनाही नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २४ जुलै रोजी ज्योती (दीड वर्ष) आणि कन्हैया (४ वर्षे) या बालकांचा मृत्यू झाला. तर भीमाशंकर व त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर आहे.