महावितरणच्या मोहिमेत आढळले सव्वादोनशे वीजचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST2021-09-12T04:22:19+5:302021-09-12T04:22:19+5:30

परभणी : महावितरणच्या येथील पथकाने ९ सप्टेंबर रोजी राबविलेल्या मोहिमेत तब्बल २२५ वीजचोर आढळले असून या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई ...

Twelve hundred power thieves found in MSEDCL operation | महावितरणच्या मोहिमेत आढळले सव्वादोनशे वीजचोर

महावितरणच्या मोहिमेत आढळले सव्वादोनशे वीजचोर

परभणी : महावितरणच्या येथील पथकाने ९ सप्टेंबर रोजी राबविलेल्या मोहिमेत तब्बल २२५ वीजचोर आढळले असून या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

वीजचोरीला आळा बसविण्यासाठी महावितरण कंपनीने रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापरणाऱ्याविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात वीजचोरांविरुद्ध कारवाईची मोहीम आक्रमकपणे राबविण्यात आली. परभणी विभाग क्रमांक १ मधील २३७ वीज ग्राहकांचे मीटर या मोहिमेत तपासण्यात आले. त्यात १३६ ग्राहकांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरला छिद्र पाडून तसेच छेडछाड करून वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. परभणी शहर उपविभागातील १२० ग्राहकांनी वीजचोरी केली असून, पाथरी व पूर्णा येथील प्रत्येकी ९ ग्राहकांनी वीजचोरी केली आहे. त्याचप्रमाणे परभणी विभाग क्रमांक २ अंतर्गत एकूण ९० ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करीत चोरी केली. या सर्व ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ अन्वये दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. चोरून वापरलेल्या विजेचे पैसे आणि दंडात्मक रक्कम अशी एकत्रित वीजबिले देण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे. बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर वीज कायद्यान्वये कारवाई केली जात आहे.

२६ जणांचा पथकात समावेश

महावितरणचे अभियंते, जनमित्र आणि लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबविली. त्यात २६ जणांचा समावेश होता. मोहीम यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता धोंगडे, बी. आर. लोंढे, उपकार्यकारी अभियंता के.ए. फड, आर.आर. मेश्राम, एम. एस. अरगडे, पंडित राठोड आदींनी प्रयत्न केले.

जिंतूरमध्ये दोघांवर गुन्हा

मीटरमध्ये छेडछाड केल्याची नोंद संगणक प्रणालीमध्ये झालेल्या ग्राहकांची तपासणी करीत असताना जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील संजय रामचंद्र बोराळकर यांनी मीटरच्या पाठीमागील बाजूस चोरी करण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे छिद्र करून वीजचोरी केल्याचे आढळले. तर दुसऱ्या तपासणीत जिंतूर शहरातील गणपती मंदिर शेजारील नाईकवाडी गल्लीतील शेख आरिफ शेख रौफ आणि शेख असद शेख रौफ यांच्या मीटरची तपासणी करताना तेथे वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही ग्राहकांवर १० सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर येथील तपासणी मोहिमेत शहर अभियंता कोळपे, सहायक अभियंता कामडी, तंत्रज्ञान लटपटे, धोंडगे, कोरेबोईनवाड, कवडे, देशमुख आदींनी सहभाग नोंदवला.

Web Title: Twelve hundred power thieves found in MSEDCL operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.