ग्रामीण भागात हळद काढणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:32+5:302021-03-27T04:17:32+5:30
स्वच्छतागृहाची दुरवस्था परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. मनपाने या ठिकाणी एका भिंतीलगत स्वच्छतागृह बांधले. ...

ग्रामीण भागात हळद काढणी सुरू
स्वच्छतागृहाची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. मनपाने या ठिकाणी एका भिंतीलगत स्वच्छतागृह बांधले. मात्र, या स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही, तसेच काही महिन्यांतच स्वच्छतागृहाची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपाने स्वच्छतागृहाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित; पाण्यासाठी भटकंती
परभणी : ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना, ग्रामस्थांना मात्र कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. योजनेचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्यासाठी शेत गाठावे लागत आहे.
शहरात मास्कची विक्री वाढली
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. १५ दिवसांपासून कारवाया सुरू केल्याने शहरी भागात मास्कची विक्री वाढली आहे. बाजारपेठ भागातील रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी मास्क विक्रीचे स्टॉल्स बुधवारपर्यंत लागलेले दिसून आले.
बस स्थानक परिसरात अस्वच्छता वाढली
परभणी : येथील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. जुने बस स्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ठिकठिकाणी मातीचे ढीग साचले आहेत, तसेच परिसरातील शौचालयाच्या बाजूस मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
बाजारपेठ भागातील रस्त्यावर खड्डे
परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. मोंढा परिसरात शेतकऱ्यांचा वावर जास्त असल्याने, त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मोंढा परिसरातील महानगरपालिकेने करावेत की बाजार समितीने, या संभ्रम निर्माण झाल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
पाण्याअभावी झाडे वाळू लागली
परभणी : शहरातील जिंतूर रस्ता आणि वसमत रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे वाळू लागली आहेत. जिल्ह्यात आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे दुभाजकावरील झाडांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपा प्रशासनाने दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.
सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत
परभणी : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक हातपंप घेतले आहेत. मात्र, या हातपंपाचे साहित्य गायब झाले असून, हातपंप बंद पडले आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तेव्हा बंद हातपंप सुरू करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
रस्त्याच्या कामाने घेतला वेग
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या कामाने वेग घेतला आहे. शहरी भागात हे काम सुरू झाले असून, एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सध्या या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक केली जात आहे.