धोकादायक इमारतीतून रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST2021-03-06T04:16:54+5:302021-03-06T04:16:54+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागासह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे दररोज ...

धोकादायक इमारतीतून रुग्णांवर उपचार
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागासह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे दररोज १० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे. भंडारा येथे जळीत प्रकरणानंतर येथील रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आली. त्यानंतर या रुग्णालयातील इमारतींचे फायर व स्ट्रक्चर ऑडीत करण्यात आले. या ऑडीटमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०० खाट, ४० खाट व स्त्री रुग्णालयाची ७० खाट तसेच क्षयरोग विभागाची इमारत अशा एकूण चार इमारती धोकादायक असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये रुग्णांवर उपचार करणे जीवितास बेतणार आहे, असे असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून या इमारतीत जवळपास २१० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. त्यातच बालरुग्ण विभागातील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली होती. यामध्ये १४ हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. या घटनेत सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी भविष्यातील धोका ओळखून रुग्णालय प्रशासनाने ही इमारत जमीनदोस्त करून या इमारतीतील विभाग दुसऱ्या इमारतीमध्ये हलविणे गरजेचे आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सद्यस्थितीतही या चार इमारतीमधून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून धोकादायक इमारती जमीनदोस्त करून रुग्णालयासाठी नवीन इमारती उभारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून केली जात आहे.
दुरुस्तीसाठी ६ लाखांचा खर्च?
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण विभागातील इमारतीच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ६ लाख रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी खर्च केला आहे. असे असतानाही २ मार्च रोजी याच इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे सा.बां. विभागाकडून दुरुस्तीचा केवळ फार्स केला जातो की काय? असा प्रश्न आता नातेवाईक व रुग्णांमधून उपस्थित केला जात आहे.