स्वाईन फ्लू संशयितावर परभणीत उपचार सुरू
By Admin | Updated: February 12, 2015 13:48 IST2015-02-12T13:48:04+5:302015-02-12T13:48:04+5:30
शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्वाईन फ्लू संशयितावर परभणीत उपचार सुरू
परभणी : शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित रुग्णाचे घशातील स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास चौधरी यांनी दिली.
शहरातील एका रुग्णास गेल्या काही दिवसांपासून सर्दी, डोके दुखण्याचा त्रास होत होता. याबाबत त्या रुग्णाने खाजगी दवाखान्यात औषधोपचार घेतला. मात्र संबंधित रुग्णास डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे सांगितले. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर संसर्गजन्य कक्षामध्ये दोन दिवस उपचार करण्यात आले. यामध्ये १0 रोजी रुग्णाची श्वसनाची तपासणी, ब्राँकाईटीस, अँटी बायोटीक्स औषधोपचार देण्यात आला. यानंतर संबंधित रुग्णाचे घशातील स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. २४ तासांत या तपासणीचा अहवाल येणे अपेक्षित आहे.
रात्री उशिरापर्यंत तपासणी अहवाल आला नव्हता. दरम्यान, हा प्रकार शहरात कळल्याने अनेक रुग्ण व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याकरिता वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे. /(प्रतिनिधी)
-------------
बाहेरगावी जाऊन आल्यानंतर अशा संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे शहरातील प्रत्येकाने नाकाला रुमाल बांधून फिरावे, शिंकताना रुमाल जवळ असावा, तसेच अनावश्यक व गर्दीच्या ठिकाणी आवश्यकता नसल्यास जाणे टाळावे, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कालिदास चौधरी यांनी केले आहे.