दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार आले २५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:23+5:302021-05-19T04:17:23+5:30
गतवर्षी राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे २३ मार्च ते १५ मे ...

दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार आले २५ टक्क्यांवर
गतवर्षी राज्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे २३ मार्च ते १५ मे २०२० दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध कार्यालयातील काही व्यवहार सुरू करण्याची मुभा केंद्र आणि राज्य सरकारने दिली होती. गतवर्षी १८ मे २०२० पासून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत आणि इतर व्यवहार सुरू झाले होते. लॉकडाऊनपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयात १८ मे ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण २ हजार ३९६ व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात झाले होते. जानेवारी २०२१ महिन्यात ३५९, फेब्रुवारी महिन्यात ४०६, मार्च महिन्यात ३९६, असे ४०० च्या आसपास व्यवहार झाले होते.यामध्ये खरेदीखत, संमतीपत्र, दत्तक पत्र, अदलाबदल, बक्षीस पत्र, भाडे पत्र, लिव्ह & लायसन्स, गहाणखत, वाटणीपत्र, सर्वाधिकार पत्र, रिलीज डिड, हक्कसोडपत्र, चूक दुरुस्तीपत्र या व्यवहाराचा समावेश आहे; मात्र एप्रिल २०२१ या महिन्यात केवळ १२३ व्यवहार झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने कडक निर्बंध लावले त्यात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एप्रिल महिन्यात १० दिवस आणि मे महिन्यात १ आठवडा शासकीय कार्यालय बंदचे आदेश काढले होते. याचा फटका खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला बसला आहे.यामुळे शासनाने मिळणाऱ्या महसुलावर देखील याचा परिणाम झाला आहे.सद्यस्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार सुरू असल्याचे चित्र आहे.दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक केले आहे. फिजिकल डिस्टन्स ठेवण्याबाबत काटेकोरपणे पालन केले जात असून दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे पूर्वपदावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
यावर्षी जानेवारी ते एप्रिलपर्यंत झालेले व्यवहार
खरेदीखत - ७४६
बक्षीसपत्र - ३१८
गहाणखत - ५७
वाटणीपत्र - २१
हक्कसोडपत्र - ८३
चूक दुरुस्त पत्र - २०
मृत्यूपत्र - ५
सर्वाधिकार पत्र - २
लिव्ह लायसन्स - ९
भाडेपत्र - १०
अदलाबदलीपत्र - ६
संमतीपत्र - ७
एकूण - १ हजार २८४
बॉक्स
जानेवारी - ३५९
फेब्रुवारी - ४०६
मार्च - ३९६
एप्रिल - १२३
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने आदेशित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू आहेत.
- व्ही. बी. पदमवार, दुय्यम निबंधक मानवत