कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने २ एप्रिलपासून या संचारबंदीत ७ तासांची सूट दिली आहे. शनिवारी शहरातील बाजारपेठ भागात सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये सूट देण्यात आली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल, या उद्देशाने ही सूट दिली असली तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपासून नारायणचाळपासून ते नानलपेठ कॉर्नरपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही वाहतूक आणखीनच वाढली. नारायणचाळ ते गांधी पार्क या रस्त्यावर अनेक वाहने विरूद्ध दिशेने रस्त्यावर धावताना दिसली. त्यामुळे तब्बल दीड तास या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे कच्छी बाजार भागात जड वाहने नेली जात असल्याने ३ तास वाहतूक ठप्प राहिली. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी तसेच या भागात बंदोबस्तासाठी लावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
संचारबंदीत सूट दिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे, खरेदी करणाऱ्या नागरिकांपेक्षाही वाहनांची गर्दी अधिक असल्याचे शनिवारी दिसून आले. बाजारपेठ भागात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्य रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शनिवारीही त्याचा प्रत्यय आला.
दुपारी दोन वाजेनंतरही वाहतूक सुरूच
संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतरही शहरातील सर्वच रस्त्यांवर बिनधास्तपणे वाहतूक सुरू असल्याचे पहावयास मिळाले. संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. सवलतीव्यतिरिक्त शहरातील वाहतूक बंद ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.