ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:08+5:302021-06-03T04:14:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : मानवत तालुक्यातील रामुपरी व परिसरात बुधवारी सायंकाळी ६च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी ...

ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानवत तालुक्यातील रामुपरी व परिसरात बुधवारी सायंकाळी ६च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे रामे टाकळी ते मानवत जाणाऱ्या रस्त्यावरील नागरजवळा शिवारातील ओढ्याला पूर आला होता. या पुरामुळे रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, सोनपेठ, सेलू व मानवत तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच परभणी शहरात रात्री ७ च्या सुमारास अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह रात्री ७ वाजता मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सोनपेठ शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच सेलू येथे जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याशिवाय मानवत तालुक्यात नागरजवळा, रामपुरी, रामे टाकळी येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये रामे टाकळी ते मानवत या रस्त्यावर असलेल्या नागरजवळा शिवारातील ओढ्यावरून पुराचे पाणी वाहात होते. या पाण्यामुळे सायंकाळी ६ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पूर्णा तालुक्यात बुधवारी पहाटे काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मशागतीच्या कामासाठी लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.