वाहतूककोंडी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:57+5:302021-07-27T04:18:57+5:30
परभणी : शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार ...

वाहतूककोंडी ठरतेय डोकेदुखी
परभणी : शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वारंवार निर्माण होत असलेली वाहतुकीची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहरात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्यावर ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे ही समस्या अधिकच वाढत आहे. शहरातील विविध भागात दररोज वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिक जाम वैतागले आहेत. गुजरी बाजार, स्टेशन रोड, नारायण चाळ परिसर, शिवाजी चौक, नानलपेठ या भागात नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण होते. सोमवारी शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने दाखल झाली. त्यातच अनेक मार्गावर जड वाहनांना प्रवेश नसतानाही ही वाहने या मार्गावरून धावत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.
येथील नारायण चाळ भागात तर दिवसभरातून आठ ते दहा वेळा वाहतूक ठप्प झाली होती. अर्धा ते पाऊण तासापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक हैराण झाले होते. या भागात दररोज वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. या परिसरात चारही बाजूंनी एकाच वेळी वाहने येत आहेत. त्यामुळे कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असताना देखील वाहतूक कोंडी मात्र नित्याची झाली आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतुकीवर परिणाम
शहरात मुख्य रस्त्यांच्या कडेने किरकोळ अतिक्रमणे वाढली आहेत. भाजी आणि फळ विक्रेत्यांचे हातगाडे, पानटपऱ्या, विविध साहित्याची विक्री करणारे स्टॉल्स, तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातील साहित्यही अनेक वेळा रस्त्यावरच ठेवले जाते. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. वाहनांसाठी रस्ता शिल्लक नसल्याने वारंवार वाहतूककोंडी होत आहे.