परभणी: तालुक्यातील पिंगळी येथील ग्रामस्थांनी विद्युत रोहित्र मंजूर करुन वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी अनेक वेळा वीज वितरण कंपनीकडे केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ३ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे शशिकलाबाई सावंत, तुळशीराम कनकुटे, पांडुरंग सावंत, राजकुमार लोखंडे आदींनी केली आहे.
लसीकरण करण्याची मागणी
परभणी: तालुक्यातील जनावरांना लाळ्या खुरकत रोगाची लागण होण्यापूर्वीच पशुसंवर्धन विभागाने तातडीने पाऊले उचलत जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत १ लाख ७२ हजार ९०१ जनावरांचे लसीकरण केले आहे. मात्र अद्यापही २ लाख जनावरे लसीकरणापासून वंचित आहेत.
अतिवृष्टीत टाकळी गावाचा समावेश करा
परभणी: तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या नवीन महसूल मंडळात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत व सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या मंडळाचा नुकसान भरपाईमध्ये समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून तत्काळ या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजी खाजा मोहिनोद्दीन वहिदोद्दीन यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रम
परभणी- शहरातील राष्ट्रीय निवासी अस्थीव्यंग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी भेटी देऊन दिव्यांगाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक इमरान अली शाह अली खान, आयेशा बेगम, सोफिया अंजुम, सुलेमान खान, मुस्तफा खान, शेख शाकेर, खुतेजा बेगम आदींची उपस्थिती होती.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
परभणी: शहरातील सुभेदार नगर, मंगेश कॉलनी या ठिकाणी मारोती मंदिर परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण करुन बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीने हटवून मुख्य रस्त्याला जागा मोकळी करुन द्यावी, अशी मागणी किरण जाधव, नागेश शिंदे, दगडोबा मोरे यांच्यासह ५० नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त देविदास पवार यांच्याकडे केली आहे.