गुरुवारी ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:17 IST2021-05-14T04:17:32+5:302021-05-14T04:17:32+5:30
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, नवीन ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही ...

गुरुवारी ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, नवीन ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने चिंता कायम आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी घटला आहे; परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. १३ मे रोजी दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात २, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ९ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला २ हजार १६५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ७३४ अहवालांमध्ये ३६६ आणि रॅपिड टेस्टच्या ४३१ अहवालांमध्ये ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४४ हजार ८९४ झाली असून, त्यातील ३९ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ८६ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ४ हजार ३४९ रुग्ण उपचार घेत आहेत.
८२१ रुग्णांना सुटी
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील आठवडाभरापासून वाढली आहे, ही बाब नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहे. गुरुवारी दिवसभरात ८२१ रुग्णांना कोरोनाची लक्षणे जाणवत नसल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.