विशेष रेल्वेवर चोरट्यांची दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:18+5:302021-04-14T04:16:18+5:30

गंगाखेड : रेल्वेत प्रवेश करून मोबाइल चोरी करीत पळ काढणाऱ्या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न राज्य राखीव दलाच्या जवानांनी केल्यानंतर या ...

Thieves throw stones at special trains | विशेष रेल्वेवर चोरट्यांची दगडफेक

विशेष रेल्वेवर चोरट्यांची दगडफेक

गंगाखेड : रेल्वेत प्रवेश करून मोबाइल चोरी करीत पळ काढणाऱ्या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न राज्य राखीव दलाच्या जवानांनी केल्यानंतर या चोरट्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनी विशेष रेल्वेवर दगडफेक केल्याची घटना १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास परळी-परभणी रेल्वेमार्गावरील वडगाव (निळा) स्टेशनवर घडली. या दगडफेकीत दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

केरळ राज्यातील निवडणूक बंदोबस्त पार पडल्यानंतर राज्य राखीव दलाच्या २२ कंपन्यांना परत सोडण्यासाठी १० एप्रिल रोजी कोची रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वे (००३६९) सोडण्यात आली. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही रेल्वे परळी ते परभणी दरम्यानच्या लोहमार्गावरील वडगाव (निळा) स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबली होती. याच वेळी चोरट्याने रेल्वेत प्रवेश करून एका जवानाचा मोबाइल चोरला. हा प्रकार इतर जवानांना लक्षात आल्यानंतर काही जण चोरट्याला पकडण्यासाठी स्थानकावर उतरले आणि चोरट्याचा पाठलाग करू लागले. वडगाव स्टेशनवर हा प्रकार सुरू असतानाच रेल्वेतील जवानांनी चेन ओढून रेल्वे थांबवली. मात्र याच दरम्यान, रेल्वेस्थानकावर चोरट्याच्या सोबत असलेल्या इतर आठ ते दहा जणांनी राज्य राखीव दलाचे जवान व रेल्वेच्या दिशेने दगडफेक करीत त्या ठिकाणाहून पळ काढला. या दगडफेकीत दोन जवान किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर एसआरपीच्या जवानांनी गंगाखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पाठलाग करताना या जवानांना घटनास्थळी एक दुचाकी आढळली. या दुचाकीचा क्रमांक आणि घटनेची माहिती गंगाखेड पोलिसांना दिल्यानंतर विशेष रेल्वे वडगाव स्टेशनहून पुढे रवाना करण्यात आली.

दरम्यान, यासंदर्भात वडगाव येथील रेल्वे स्टेशन मास्तर राहुल डोंबे यांच्याशी संपर्क साधला असता, दगडफेक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडगाव येथे भेट दिली. मात्र पाहणी केली तेव्हा त्या ठिकाणीही काहीही आढळले नाही, असे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सांगितले.

Web Title: Thieves throw stones at special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.