स्वातंत्र्य दिनापूर्वी आंदोलनांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST2021-08-14T04:22:15+5:302021-08-14T04:22:15+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे तालुका सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड व अमित काळे हे उपोषणास बसले आहेत. युनियन बँक ...

स्वातंत्र्य दिनापूर्वी आंदोलनांची रेलचेल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातर्फे तालुका सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड व अमित काळे हे उपोषणास बसले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच येथील कर्ज वाटपाची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. पूर्णा तालुक्यातील माहेर येथील ग्रामस्थ रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. उपोषणार्थींमध्ये अविनाश पौळ, मोतीराम पौळ, तिरुपती पौळ, बालाजी पौळ आदींची नावे आहेत. परभणीतील प्रियदर्शनी नगर भागातील गंगाबाई कांबळे यांनी उपोषण सुरू केले असून, त्यांची बळकावलेली जागा ताब्यात द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी फाटा येथील माता इंद्रायणी गोशाळा येथील दत्ता पहारे व अरुण पवार यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यात गोशाळेस गायरान जमीन द्यावी व या परिसरातील चरण्यासाठी आलेली जागा अतिक्रमणमुक्त करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील सर्व्हे नंबर ४४१, ४४५ च्या जमिनीची मोजणी करावी, या मागण्यांसाठी लक्ष्मण पवार, जहीर अहमद यांनी उपोषण सुरू केले आहे. संघर्ष सेनेच्या वतीने गोकुळदास लोया यांनी नागरी सुविधांच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. परभणी येथील नागनाथ पांचाळ यांनी जागेची मागणी व सरकारी हद्द कायम करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. भगवान लंगोटे, भगवान सोनवणे, मेसाजी खिल्लारे, रामा वावळे, वैजंजा घाटूळ यांनी मनपातील नगर रचनाकार किरण फुटाणे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. राजकुमार शर्मा यांनी मनपाच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे.