स्वच्छतागृह नसल्याने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST2021-02-13T04:17:56+5:302021-02-13T04:17:56+5:30
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक शाळांना यु डायसवर माहिती ...

स्वच्छतागृह नसल्याने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक शाळांना यु डायसवर माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुले व मुलींसाठी स्वच्छतागृहच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १२८ शाळा आहेत. त्यापैकी मुलींसाठी १ हजार ३२ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. उर्वरित ९६ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. मुलांसाठी ९७२ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. १५६ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहच नाहीत. त्यामुळे या मुलांना नाईलाजाने उघड्यावर जावे लागत आहे.
मुलांसाठी कमी स्वच्छतागृह
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, जिल्हा परिषद, शासकीय अशा एकूण २ हजार १०७ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ९३९ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह आहेत. १,६९८ शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृह नाहीत, तर मुलींसाठी २ हजार १०७पैकी २ हजार १ शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे. १०६ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही.
कर्मचारी नसल्याने स्वच्छतेत अडसर
जिल्ह्यातील जवळपास २ हजार शाळांमध्ये मुले व मुलींसाठी स्वच्छतागृह आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षकांना अनेक वेळा खासगी व्यक्तींकडूनच स्वच्छतागृह स्वच्छ करून घ्यावे लागते. यासाठी निधीचीही तरतूद नाही. त्यामुळे नियमित साफसफाई करण्यास या शाळांना अडचणी येत आहेत.
शासकीय शाळांचीच अधिक अडचण
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या २ हजार १०७पैकी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत. मुलांसाठी असलेल्या ८६.१७ टक्के शाळांमध्ये, तर मुलींसाठी असलेल्या ९१.४९ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. उर्वरित शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अडचण आहे. मुलांसाठी असलेल्या शासकीय ८५.७१ टक्के शाळांमध्ये, तर मुलींसाठीच्या ५७.१४ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या १०० टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. खासगी अनुदानित मुलांच्या शाळांमध्ये ९८.५८ टक्के, तर मुलींच्या ९९.३९ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत. खासगी विनाअनुदानित मुलांच्या व मुलींच्या ९९.१५ टक्के शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आणि शासकीय शाळांमध्ये स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे.