टेस्टिंग केंद्र सुरू; पण अडवले तरच चाचणी करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:25+5:302021-06-06T04:14:25+5:30
शहर महापालिका स्तरावर सध्या तीन ठिकाणी चाचणी केंद्र तात्पुरत्या स्वरूपात उभारले आहे. मागील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर चाचण्याही झाल्या. ...

टेस्टिंग केंद्र सुरू; पण अडवले तरच चाचणी करू
शहर महापालिका स्तरावर सध्या तीन ठिकाणी चाचणी केंद्र तात्पुरत्या स्वरूपात उभारले आहे. मागील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर चाचण्याही झाल्या. परंतु, त्यावेळी मनपा पथकासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची चाचणी केली जात होती. या चाचणीला मध्यंतरी २-३ दिवस आरटीपीसीआर किटचा तुटवडा झाल्याने अँटिजन चाचणी करून तपासणी करण्यात आली. यानंतर शहरातील बाजारपेठ सलग तीन दिवस खुली करण्यात आली. त्यावेळी बाजारात गर्दी झाली. परंतु, गर्दीच्या कालावधीत टेस्ट न करता दुपारी दोननंतर दुकाने बंद झाल्यावर बाहेर फिरणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे नेमका संसर्ग होण्याचा धोका असणाऱ्या कालावधीतच टेस्ट होत नसल्याचे दिसून आले होते.
शनिवारी दुपारपर्यंत ३७० चाचण्या
शहरातील काळी कमान येथे १२०, जिंतूर रोड येथे १५० तर शिवाजी चौकात १०० अशा ३७० चाचण्या शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत झाल्या. संध्याकाळपर्यंत या चाचण्या सुरूच होत्या. याशिवाय मनपाने सिटी क्लब येथे कायमस्वरूपी आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू केले आहे. परंतु, स्वतःहून तेथे जाऊन नागरिक चाचणी करण्यास धजावत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मनपाचा एकूण चाचणी आकडा कळेना
शहरात दोन ठिकाणी खासगी तपासणी केंद्रांवर दररोज होणाऱ्या चाचणीचा व जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यात अन्य ठिकाणी होणाऱ्या चाचण्यांचा आकडा यांचा तपसील वेगवेगळ्या विभागाकडे आहे. मनपाकडे मात्र शहरातील एकूण झालेल्या चाचण्यांचा आकडा नसल्याने मनपा हद्दीत किती चाचण्या मनपाने केल्या व अन्य विभागांनी किती केल्या, याचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येते. जिल्हा आरोग्य विभाग दररोज सायंकाळी एकूण चाचण्यांची संख्या कळवते. त्यात मनपा हद्दीतील चाचण्या किती हे समजत नाही.