हजरत सय्यद शहा तुराबुल हक उरुसानिमित्त महावितरणच्या वतीने शहरातील जिंतूररोडवरील १३२के. व्ही. उपकेंद्रात दुरुस्तीचे काम २९जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते.
दहा तास वीजपुरवठा खंडित
परभणी : हजरत सय्यद शहा तुराबुल हक उरुसानिमित्त महावितरणच्या वतीने शहरातील जिंतूररोडवरील १३२के. व्ही. उपकेंद्रात दुरुस्तीचे काम २९जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते. या कामानिमित्त संपूर्ण शहराचा वीज पुरवठा दहा तासासाठी खंडित करण्यात आला होता. यामुळे विजेअभावी अनेकांची कामे खोळंबली. महावितरणच्या शहर विभागाअंतर्गत शहराला वीजपुरवठा करण्यात येणार्या १३२ केव्ही उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. गुरुवार या दिवशी महावितरणकडून विजेची तांत्रिक कामे करण्यात येतात. या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४.३0 वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. २फेब्रुवारीपासून उरुसाला सुरुवात होत आहे. यानिमित्त शहराचा विद्युत पुरवठय़ाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत कुठलाही अडथळा येऊ नये, या करीता वीजपुरवठा खंडित करुन कामे करण्यात आल्याची माहिती शहर विभागाचे अभियंता चव्हाण यांनी दिली. /(प्रतिनिधी)
----------------
अत्यावश्यक सेवा असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या वीज पुरवठय़ावर कुठलाही परिणाम होऊ देण्यात आला नाही. संपूर्ण शहरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असला तरी जिल्हा रुग्णालयाची वीज मात्र सुरळीत होती. अत्यावश्यक सेवा असल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित न करता काम करण्यात आले.