कृषी विद्यापीठाच्या जागेवर होणार तालुका क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST2021-01-08T04:50:39+5:302021-01-08T04:50:39+5:30
राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु जिल्ह्यातील परभणी, पालम, गंगाखेड, सोनपेठ ...

कृषी विद्यापीठाच्या जागेवर होणार तालुका क्रीडा संकुल
राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु जिल्ह्यातील परभणी, पालम, गंगाखेड, सोनपेठ व पाथरी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे राज्य शासनाच्या या धोरणात्मक निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी होत नव्हती. यासंदर्भात जनरेटा वाढल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. त्यानंतर परभणी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे क्रीडा विभागाने जागेची मागणी केली. त्यानुसार कृषी विद्यापीठाने त्यांच्या ताब्यातील जागा देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आ. बाबाजाणी दुर्राणी यांनी राज्य शासनाकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याबाबत लेखी स्वरूपात माहिती दिली आहे. त्यात परभणी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सोनपेठ येथील तालुका क्रीडा संकुलासाठी पाटबंधारे विाभागाची जागा उपलब्ध झाली आहे. पालम व गंगाखेड येथील तालुका क्रीडा संकुलासाठी खासगी संस्थेची जागा उपलब्ध करून घेण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे क्रीडामंत्री केदार यांनी म्हटले आहे.
पाथरीसाठी जागा मिळेना
पाथरी येथेही तालुका क्रीडा संकुल मंजूर झाले आहे; परंतु यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे क्रीडामंत्री केदार यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्याच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न आणखी किती दिवस प्रलंबित राहतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाथरी येथे राज्य शासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे; या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणे कायम आहेत. असे असताना तालुका क्रीडा संकुलासाठी जागा कशी काय मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.