गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान
By Admin | Updated: October 23, 2014 14:15 IST2014-10-23T14:15:23+5:302014-10-23T14:15:23+5:30
गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला.

गोदावरीच्या पात्रातून आणलेल्या पाण्याने 'सचखंड' ला तख्तस्नान
अमरिकसिंघ वासरीकर /नांदेड
गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला.
नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे दीपावलीच्या पूर्वसंध्येस तख्तस्नान करण्याची पुरातन परंपरा आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मित जत्थेदार भाई ज्योतिंदरसिंघजी यांच्या अरदासनंतर घागरियासिंघ भाई हरदयालसिंघ यांनी घागर गोदावरी नदीच्या काठावर आणली. येथे गोदावरी नदीचे विधिवत पूजन करण्यात आले. आरती करुन भाविकांतर्फे पाणी घेण्याची आज्ञा मागण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रत्येक भाविकांनी आपल्या क्षमतेप्रमाणे आणलेल्या भांड्याने गोदावरीच्या पात्रातून पाणी घेतले व सचखंड येथे आणले.
मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी सचखंड येथील गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्र भाविकांना सेवेकरीता दिली. गुरुद्वारा येथील अंतर्गत भागातील सोन्याचे दरवाजे, बाह्य भागातील चांदीचे दरवाजे, पालखीसाहिब, चौर, समईसह भिंतीवर पाणी शिंपडून संपूर्ण परिसराची सेवा करण्यात आली. अबालवृद्धांनी सोन्या-चांदीच्या दरवाजांची सुगंधी उटणे व साबणांचा वापर करुन सेवा केली. यावेळी महिला व मुलींनी मोठय़ा प्रमाणात दूध, दहीचा वापर करुन परिसर स्वच्छ केला. चार वेळा गोदावरीच्या पात्रातून प्रत्येकाने पाणी आणले तर एकवेळा गुरुद्वारा परिसरातील बावडीसाहिब येथून पाणी घेण्यात आले.
श्री गुरुगोविंदसिंघजी, महाराजा रणजितसिंघजी, बाबा दीपसिंघजी, पंजप्यारे साहिबान व इतर सिंघ साहिबांच्या ऐतिहासिक शस्त्रांची सेवा गुरुद्वारा परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपात करण्यात आली. तलवार, बर्चा, पिस्तूल, रायफल, क्रपान, खंजर, बिछवे, करामती तलवार आदी ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करण्याकरिता शिकलकरी समाज मोठय़ा उत्साहाने सहभागी झाला होता. शस्त्रांच्या सेवेनंतर भाविकांच्या दर्शनाकरिता ही शस्त्रे सजवून ठेवण्यात आली होती. सायंकाळी मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी परत ही शस्त्रे गर्भगृहात ठेवली.
तख्तस्नानाच्या कार्यक्रमाने सचखंड येथे दीपोत्सवास प्रारंभ झाला. सायंकाळी भाविकांनी मोठय़ा प्रमाणावर निशानसाहिब व गुरुद्वारा परिसरात मेणबत्ती लावून रोषणाई केली होती. २३ ऑक्टोबर रोजी 'बंदी छोड' दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी रहेराससाहिबांच्या पाठनंतर तरुणांतर्फे गतका प्रदर्शन करण्यात येणार आहे.
२४ रोजी दीपमाला महल्ला निघणार आहे. दुपारी चार वाजता ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करुन या महल्ल्यास प्रारंभ होईल. यात गुरुसाहिबांचे निशानसाहिब, घोडे, गतका आखाडे, कीर्तनी जत्थे सहभागी होणार आहेत. हा महल्ला गुरुद्वारा गेट क्र. १ मार्गे महावीरस्तंभापर्यंत येईल. येथे निशानचीसिंघांच्या अरदासनंतर सहभागी भाविक हातात उघडी शस्त्रे घेऊन प्रतीकात्मक हल्ला करतात. हा महल्ला शहीद भगतसिंघरोड मार्गे सचखंड येथे रात्री उशिरा परत येतो. २५ रोजी नगीनाघाट येथून गुरुग्रंथसाहिबजींचे नगरकीर्तन सकाळी नऊ वाजता काढण्यात येणार आहे. मुख्यग्रंथी भाई कश्मीरसिंघजी यांच्याद्वारे गुरुग्रंथसाहिबजींचे आगमन सचखंड येथे होणार आहे. पंजप्यारे साहिबान व संत-महात्म्यांच्या उपस्थितीत गुरुग्रंथसाहिबजींना विधिवत गुरु-त्ता-गद्दी प्रदान करण्यात येणार आहे. गुरु-त्ता-गद्दीनिमित्त गुरुग्रंथसाहिबजी भवन येथे २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विशेष कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देश-विदेशातून नामवंत रागी जत्थे, कथाकार, कवी, ढाढी जत्थे आपली हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप २९ ऑक्टोबर रोजी पंचमीच्या दिवशी होणार आहे. यानिमित्त दुपारी चार वाजता नगरकीर्तन काढण्यात येणार आहे. हे नगरकीर्तन महाराजा रणजितसिंघजी यात्रीनिवास मार्ग, भगतसिंघरोड, जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, वजिराबाद, मुथा चौक, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, चिखलवाडीमार्गे सचखंड येथे येणार आहे. या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून गुरुंचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष विजय सदबीरसिंघ व अधीक्षक रणजितसिंघ चिरागिया यांनी केले आहे.
■ नगीनाघाट व बंदाघाट येथील गोदावरी पात्रातील पाणी मोठय़ा प्रमाणात दूषित झाले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.