परभणीत राष्ट्रवादी-स्वाभिमानी संघटनेनं जाळला दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा
By Admin | Updated: May 11, 2017 14:38 IST2017-05-11T14:37:55+5:302017-05-11T14:38:12+5:30
शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळा जाळला.

परभणीत राष्ट्रवादी-स्वाभिमानी संघटनेनं जाळला दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 11 - शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गुरुवारी (11 मे) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहन केले.
जालना येथील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीच्या अनुषंगाने बुधवारी आक्षेपार्ह विधान केले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम, किशोर ढगे, बाळासाहेब कदम, जाफर शेख आदी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले व त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडूनही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष सुमंत वाघ, नगरसेवक इम्रान लाला, बाबा देशमुख, किरण तळेकर आदी उपस्थिती होते.