भुयारी मार्गाचा रखडला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:32+5:302021-07-25T04:16:32+5:30
परभणी : शहरातील रेल्वे स्थानकावरून परळी व औरंगाबादकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ठिकाणी भुयारी मार्ग उभारणे आवश्यक आहे. या संदर्भातील ...

भुयारी मार्गाचा रखडला प्रश्न
परभणी : शहरातील रेल्वे स्थानकावरून परळी व औरंगाबादकडे जाणाऱ्या मार्गावर तीन ठिकाणी भुयारी मार्ग उभारणे आवश्यक आहे. या संदर्भातील प्रस्ताव रखडल्याने या भागातील हजारो नागरिकांची दररोज हेळसांड होत आहे.
परभणी रेल्वे स्थानकावरून परभणी- परळी या मार्गावर साखला प्लॉट आणि परभणी -औरंगाबाद या मार्गावर भीमनगर आणि पारवा गेट याठिकाणी रेल्वे फाटक आहेत. या तीनही फाटकांवर भुयारी मार्ग उभारावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. येथील रेल्वेस्थानकावरून दररोज ३० ते ४० रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे वारंवार रेल्वे फाटक बंद होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. दवाखाना, बसस्थानक, शाळा, महाविद्यालय तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकाजवळील या तीनही फाटकांवरून भुयारी मार्ग उभारणे किंवा लोखंडी पूल व इतर पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
या प्रश्नावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची नुकतीच भेट घेतली. साखला प्लॉट, भीमनगर आणि पारवागेट येथे तीन रेल्वे फाटकावर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ग्राहक पंचायतच्या तालुका शाखेचे अब्दुल रहीम, के. बी. शिंदे, धाराजी भुसारे, सय्यद रफिक पेडगावकर, गोपाळ कच्छवे, विजय चट्टे, बाबासाहेब भोसले, लक्ष्मण पवार, योगीराज वाकोडे, मुजीब खान, चंद्रकांत घाडगे आदी यावेळी उपस्थित होते.