नुकसानीच्या पंचनाम्याचे प्रस्ताव सादर करा : वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:13+5:302021-07-15T04:14:13+5:30
परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतातील पिके, घरांचे मोठे नुकसान ...

नुकसानीच्या पंचनाम्याचे प्रस्ताव सादर करा : वडेट्टीवार
परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतातील पिके, घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस कमिटीचे मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले. त्यात परभणीत अतिवृष्टीने गजानन नगर, संत सेना नगर, आशीर्वाद नगर, क्रांती चौक, हडको, धाररोड, भीम नगर, साखला प्लॉट, दादाराव प्लॉट, कॅनॉल परिसर, अमरधाम स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या वसाहती व पाथरी रोड, जिंतूर रोड भागातील छोट्या-मोठ्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे अनेक घरांना पाण्याने वेढले होते. परिणामी, नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शिवाय जिल्ह्यात जवळपास १० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नुकसान झालेले शेतकरी, नागरिक आणि पशुपालक यांना मदत देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या पत्रावर मंत्री वडेट्टीवार यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील पंचनामे करून मदतीसाठीचा प्रस्ताव तपासून सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनाम्याचे आदेश
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी या अनुषंगाने सर्व तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना पत्र पाठविले असून, त्यात १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने आपल्या तालुक्यात शेतातील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास पंचनामे करावेत, तसेच यासंदर्भातील संयुक्त अहवाल तत्काळ सादर करावा, असे यासंदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.