मुखेडचे उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर
By Admin | Updated: November 5, 2014 13:41 IST2014-11-05T13:41:42+5:302014-11-05T13:41:42+5:30
प्रशस्त इमारत सर्व सुविधा संपन्न असणार्या या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

मुखेडचे उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर
किशोरसिंह चौहान/मुखेड
येथील उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर आहे. प्रशस्त इमारत सर्व सुविधा संपन्न असणार्या या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करुनही रुग्णालयात घाणीचे साम्राज्य जैसे थे आहे.
मुखेडसारख्या डोंगराळ भागात दज्रेदार शासकीय रुग्णालय असावे यासाठी तत्कालीन आरोग्य संचालक श्रीपती चव्हाण यांच्या प्रयत्नाने युती शासनाच्या काळात मुखेड तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी देण्यात आली. रुग्णालयास लागणारी जागा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष कै. गोविंद राठोड यांनी दोन ते तीन एकर जागा दिली. या जागेवर रुग्णालय उभारण्यात आले. सुरुवातीला या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यासह शेजारील तालुक्यांतील रुग्णांची गर्दी होऊ लागली. त्या काळात रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार दिले जायचे.
तत्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पुंडे, डॉ. कादरी, डॉ. गुट्टे, डॉ. जयपाल चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालय व्यवस्थित चालवले. रुग्णांना चांगली सेवा दिली. सर्पदंशांच्या शेकडो रुग्णांना या रुग्णालयातून डॉ. पुंडे यांनी जीवदान दिले. डॉ. कादरी, डॉ. चव्हाण यांच्या प्रयत्नाने अनेक बालरुग्णांचे आजार कमी झाले. एकेकाळी रुग्णसेवेसाठी तत्पर असलेला मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालय आज मरणासन्न अवस्थेत आला आहे. सध्या रुग्णालय सलाईनवर असल्याने रुग्णाचे बेहाल होत आहेत.शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात १४ वैद्यकीय अधिकारी, २७ परिचारिका, ३ ब्रदर्स यासह १0५ कर्मचारीवर्ग आहेत. आरोग्य विभागाकडून १४ वैद्यकीय अधिकार्यांना मुख्यालयी राहून रुग्णसेवा करण्याचे आदेशीत केले असताना अनेक तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून रुग्णांची कागदोपत्री तपासणी करीत असतात. या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आंगद जाधव हे तर बालरोग तज्ज्ञ तर त्यांच्या पत्नी डॉ. गुट्टे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. हे दोघे मुख्यालयी राहून उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची सेवा करीत असतात. पण नेत्रतज्ज्ञ डॉ. तडाडे, एम. डी. फिजीशिएन डॉ. पटेल, अस्थिरोग तज्ञ डॉ. आनंद पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. मीरा कांगणे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रीमती के. एम. डिकळे आदी वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून तर काही जण पगारीच्या दिवशी रुग्णालयात भेट देत असल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे.
याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाधव यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अशा वैद्यकीय अधिकार्यांची आरोग्य संचालक यांच्याकडे आदीसह तक्रार केली असून यावर कारवाई करण्याची मागणी कल्याचे सांगितले. पण या वैद्यकीय अधिकार्यांचे वेतन का दिल्या जात आहे.याबाबत विचारले असता ते बोलण्यास टाळले.या उपजिल्हा रुग्णालयात १४ पैकी दोन अस्थायी तर तीन बंदपत्रीत वैद्यकीय अधिकारी आहेत. अस्थायी व बंदपत्रीत अधिकार्यावर उपजिल्हा रुग्णालय चालत असल्याचे चित्र आहे. १७ अधिपरिचारिकेपैकी २0 अधिपरिचारिका हे बंदपत्रीत म्हणजे एक वर्षासाठी करार केलेल्या कर्मचारी आहेत. रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात औषधींचा तुटवडा असून रुग्णांना खाजगी औषधी दुकानातून विक्री करावे लागत आहे. तीन रुग्णवाहिका पैकी एकच रुग्णवाहिका कार्यरत आहे. सध्या आरोग्य संचालक सतीश चव्हाण हे मुखेडचे भूमिपुत्र आहेत. डॉक्टर मंडळी व राजकीय पुढारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डॉ. अंगद जाधव व त्यांच्या पत्नी डॉ. गुट्टे यांनी रुग्णालय जननी सुरक्षा योजना राबविण्याचा प्रयत्न करीत असून डॉ. जाधव यांनी एक्सरे विभाग, सिटीस्कॅन व शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित केले आहे. पण वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने तेही हतबल झाले आहेत.
■ रुग्णालय व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून रुग्ण परिसर स्वच्छतेसाठी दर महिना १५ हजार तर रुग्णालयातील शौचालय स्वच्छतेसाठी दर महिन्याला बारा हजार रुपयांचे अनुदान असताना रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सौर ऊर्जा प्रकल्प अद्याप उभारण्यात आलेले नाही. सौर ऊर्जा प्रकल्पाचे काही साहित्य छतावर अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहे. याबाबत विभागप्रमुखांशी संपर्क केला अता त्यांनी यातील काही साहित्य चोरीस गेल्याचे सांगितले.