सेलू (जि. परभणी) : क्रीडा स्पर्धेत यश मिळविले असल्यास इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण दिले जातात. यासाठी पूर्वी ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात होते. परंतु, त्यात बदल करून शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे.
प्रत्येक वर्षी दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अर्ज मागविले जात होते. त्या माहितीचे संकलन करून क्रीडा कार्यालयाद्वारे सदरचे अर्ज माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त मंडळास क्रीडा ग्रेस गुण मिळण्याकरिता पाठविले जातात. सन २०२३-२४ पर्यंतची ही ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणिवांमुळे क्लिष्ट होत होती. तिचा फटका विद्यार्थ्यांना गुण न मिळाल्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून म्हणजेच २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीनेमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी ‘आपले सरकार’द्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार नाहीत, असे नमूद केले आहे.
जबाबदारी संस्थेवरतालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय प्रमुख यांनी पात्र विद्यार्थ्यांना या सूचनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, याची जबाबदारी संस्थेवर आहे. समस्या आल्यास जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.- उमेश राऊत, गटशिक्षणाधिकारी, सेलू