बोरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून शाडूच्या व काळ्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. उपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका व्ही. बी. झोडपे यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करून ९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शाडूच्या व काळ्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. उपळकर व शिक्षिका व्ही. बी. झोडपे यांनी विद्यार्थ्यांना सहजरित्या मूर्ती बनविण्याचे कौशल्य शिकवले. विद्यार्थ्यांनी कमी खर्चात घरच्या घरी गणपती मूर्ती बनवल्यामुळे पालकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
या विद्यार्थ्यांचा समावेश
शाडूच्या व साध्या मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अन्वय गोपाळ लाखकर, आर्या मदनराव देशमुख, वेदिका रामेश्वर डोंबे, श्रेया बाबाराव गायकवाड, अधिराज गजानन चौधरी, स्वरा कसपटे, श्रावणी बाबासाहेब चिंधे, प्राची प्रकाश रापेल्लीवार, कन्हेया विनायक राऊत यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांसह उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेकडून कौतुक करण्यात आले.