धोंडीत तापाच्या साथीचे रुग्ण
By Admin | Updated: July 28, 2014 00:53 IST2014-07-27T23:44:20+5:302014-07-28T00:53:07+5:30
दैठणा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धोंडी येथील तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहे़ त्यामुळे धोंडी गावामध्ये तापासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे़

धोंडीत तापाच्या साथीचे रुग्ण
दैठणा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धोंडी येथील तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहे़ त्यामुळे धोंडी गावामध्ये तापासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे़
धोंडी हे गाव १ हजार ५० लोकवस्तीचे आहे़ गावामध्ये सहा हातपंप असून, त्यापैकी पाच हातपंप बंद आहेत़ एकाच हातपंपावर गावातील ग्रामस्थ पिण्याचे पाणी भरत आहेत़ पाणी पिल्यामुळे तापाचा आजार फैलावला असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ गावातील १३३ जण तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़ हे सर्व रुग्ण दैठणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत़ एवढे रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे़ वैद्यकीय अधिकारी नंदकुमार मोरे यांनी २६ जुलै रोजी धोंडी गावात शिबीर घेतले़ यावेळी जि़प़ सदस्य उत्तमराव कच्छवे, पं़स़ सदस्या काशीबाई कच्छवे, सरपंच निर्मलाबाई बुचाले, सीताराम कच्छवे, त्र्यंबक बुचाले, अभय कच्छवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ गिते, तालुका आरोग्य अधिकारी पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ़ नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ़ नंदकुमार मोरे, सुदर्शन शिंदे, राऊत, गुट्टे, मुंडे, कळसाईतकर, मकासरे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती़ गावातील रुग्ण औरंगाबाद, नांदेड, परभणी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत़ (वार्ताहर)
डेंग्यूचे डास आढळले
डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली असता, ३२ घरातील पाण्याच्या भांड्यात डेंग्यूचे डास आढळून आले आहेत़ डेंग्यु डासांची पैदास होऊ नये म्हणून प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून गावात घरोघरी जावून फवारणी केली जात आहे़
१३३ रुग्णांची केली तपासणी
आरोग्य कर्मचाऱ्यांनी १३३ रुग्णांची तपासणी केली़ ४३ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी परभणी येथे पाठविण्यात आले आहे़ त्या पैकी ५ रुग्णांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले़