झाडांना आग लावून वृक्षतोड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:39+5:302021-05-12T04:17:39+5:30
परभणी ते वसमत रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या आयटीसी ...

झाडांना आग लावून वृक्षतोड सुरू
परभणी ते वसमत रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या आयटीसी मॉल ते असोलादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांना आग लावून नंतर ती झाडे तोडून नेण्याचा प्रकार वाढला आहे. गेल्या आठवड्यात अशी ८ झाडे तोडण्यात आली आहेत. चार दिवसांपूर्वी या रस्त्यालगत ३ झाडे तोडताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता ही झाडे वाळलेली आहेत, रोडवर पडून अपघात होईल, यासाठी साहेबांनी तोडण्यास सांगितल्याचे संबंधित कामगारांनी सांगितले. कोण साहेब आहेत? अशी विचारणा केली असता ते आमच्या गुत्तेदाराला माहीत आहे, असे म्हणून त्यांनी वृक्षतोड कायम ठेवली. याबाबत अधिक चौकशी केली असता काहींनी ही झाडे वीटभट्ट्यांसाठी तोडण्यात येत असल्याचे सांगितले. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वन विभाग किंवा अन्य एकाही विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे या लाकूड चोरांचे फावत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींमधून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.