भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:11+5:302021-06-27T04:13:11+5:30
ताडबोरगाव परिसरातील देवलगाव, सावरगाव ,आंबेगाव, कोल्हा ,कोल्हावाडी ,सोमठाणा, आटोळा आदी भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस झाला. मृग नक्षत्रातच ...

भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंकलरने पाणी
ताडबोरगाव परिसरातील देवलगाव, सावरगाव ,आंबेगाव, कोल्हा ,कोल्हावाडी ,सोमठाणा, आटोळा आदी भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच दमदार पाऊस झाला. मृग नक्षत्रातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते .याच आशेवर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून खरीपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. आता हे सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मानवत तालुक्यात सर्वात कमी १३२ मिमी पाऊस झाला आहे. त्यातच मागच्या दहा-बारा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतून माना वर काढलेल्या पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहे. ज्यांच्याकडे विहीर, बोअर अशी सिंचनाची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांकडून पिकांना वाचवण्यासाठी भर पावसाळ्यात स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ आली आहे.
दूबार पेरणीची भिती
यंदा अगोदरच खत, बी-बियाणे यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अशातच पावसाने मारलेली दडी ,वन्य प्राण्यांनी घातलेला हैदोस व किडींचा झालेला प्रादुर्भाव या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. गत तीन-चार दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत असून पावसाचा टिपूसही पडत नसल्याने शेतकरी धास्तावल्याचे चित्र आहे. पिकांना पावसाची नितांत गरज असून पावसाअभावी जमिनीतून वर आलेले कोवळे अंकुर करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे .
मागील दहा-बारा दिवसापासून पावसात खंड पडल्याने कापसाचे पीक माना टाकत आहे. त्यामुळे तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे.
आसाराम देशमुख ,शेतकरी ताडबोरगाव