पाथरी : विद्युतवाहिनीमध्ये घर्षण ठिणगी पडून लागलेल्या आगीमध्ये शेतातील झोपडी वजा घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील वाघाळा शिवारात सोमवारी (दि. 8 ) दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. आगीत संसार उपयोगी आणि शेती साहित्य जळून खाक झाले. तसेच 45 कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये शेख अब्बास शेख बाबामिया यांचे शेतात घर आहे. सोमवारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या झोपडीवरून जाणाऱ्या विद्युतवाहिनीत घर्षण झाले अन ठिणगी पडली. यामुळे झोपडीने आग पकडली आणि बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट दिसल्याने शेजारील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली होती. आगीमध्ये ४५ कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर रासायनिक खताच्या २० बॅग, घर खर्चासाठी ठेवलेली रोख, संसार उपयोगी आणि शेतीसाठीचे साहित्य जळून खाक झाले आहे.