टर्फ विकेटचे भिजत घोंगडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:23+5:302021-03-27T04:17:23+5:30
ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी ...

टर्फ विकेटचे भिजत घोंगडे कायम
ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो; परंतु परभणी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांत स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही तालुका क्रीडा संकुल उभारण्यात राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नाइलाजास्तव दररोज ग्रामीण भागातील युवकांवर रस्त्याच्या कडेने धावण्याचा सराव करण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे जिल्हा क्रीडा संकुलात शहरातील खेळाडूंना क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह अनेक आदी खेळांचा सराव करण्यासाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध आहे. खेळाडूंना जिल्हा क्रीडा संकुलात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी हजारो रुपयांचा खर्च केला जातो. तरीही भौतिक सुविधांची वाणवा या ठिकाणी दिसून येते. क्रिकेट खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा संकुलात मागील अनेक वर्षांपासून टर्फ विकेट तयार करावी, यासाठी संघटना व खेळाडूंची मागणी आहे. या मागणीचा विचार करून लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास २० लाखांचा निधी मंजूर करीत येथील मैदानात टर्फ विकेटचे काम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र हा निधी मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. विशेष म्हणजे केवळ माती टाकून या टर्फ विकेटचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खेळाडूंना सुविधांसाठी निधी उपलब्ध असूनही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या उदासीन धोरणामुळे टर्फ विकेटचे काम वर्षभरापासून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे.
क्रीडा संघटना नावालाच
शहरातील खेळाडूंना भौतिक सुविधांसह वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण व त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडा संघटनांची, असोसिएशनची उभारणी केली जाते. परभणी जिल्ह्यात जवळपास ७१ हून अधिक संघटना, असोसिएशन कार्यरत आहेत; मात्र जिल्हा क्रीडा संकुलात मागील वर्षभरापासून टर्फ विकेटचे काम सुरू असून, ते पूर्णत्वास जात नाही, याबाबत एकाही संघटनेने आवाज उठविलेले नाही. त्यामुळे जिल्हा क्रीडांगणात खेळाडूंना सुविधांचा सामना करावा लागत असताना या संघटना एकही शब्दही बोलत नाही. त्यामुळे या संघटना नावापुरत्याच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.