आतापर्यंत ३५८ पोलीस कर्मचारी कोरोनाने बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST2021-05-07T04:18:08+5:302021-05-07T04:18:08+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रमुख भूमिका बजावणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कायदा ...

आतापर्यंत ३५८ पोलीस कर्मचारी कोरोनाने बाधित
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्रमुख भूमिका बजावणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असताना आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संचारबंदीची अंमलबजावणी करीत असताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने घेरले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी सध्या १०१ कर्मचारी उपचार घेत आहेत. २५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून, ते कर्तव्यावर रुजू झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
पाथरी, कोतवाली ठाण्यातील कर्मचारी बाधित
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. पाथरी पोलीस ठाण्यातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. तर परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यामधील दहा ते बारा कर्मचारीदेखील कोरोनाबाधित झाले आहेत. तपास कामे करताना तसेच शहरात बंदोबस्तासाठी तैनात असताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत सात पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याचीदेखील तेवढीच काळजी घ्यावी लागत आहे. नागरिकांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.