ग्रामीण भागात दोन महिन्यांत आढळले सोळा हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:00+5:302021-06-04T04:15:00+5:30
परभणी : जिल्ह्यातील परभणी ग्रामीणसह ८ तालुक्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक १६ हजार ४२५ रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य ...

ग्रामीण भागात दोन महिन्यांत आढळले सोळा हजार रुग्ण
परभणी : जिल्ह्यातील परभणी ग्रामीणसह ८ तालुक्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक १६ हजार ४२५ रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. यामध्ये परभणी, जिंतूर, पूर्णा व सेलू तालुक्यात हा संसर्ग सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मागील दोन महिन्यात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली. ही बाब जिल्ह्यासाठी चिंतेची ठरली होती. या दोन महिन्यांत मृत्यूचे प्रमाण वाढलेले होते. जिल्ह्यात ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात आठ हजार ७८३ रुग्ण आढळले, तर सात हजार ६४२ रुग्ण मे महिन्यामध्ये आढळून आले. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये १२३१ रुग्ण आढळले होते. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात रुग्णांची संख्या चार ते पाच पट अधिक असल्याचे दिसून येते.
चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील ग्रामीण भाग, जिंतूर तालुका, पूर्णा तालुका व सेलू तालुक्यात सर्वाधिक रुग्ण दोन महिन्याच्या कालावधीत आढळले आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात परभणी तालुक्यात २ हजार ६८६, जिंतूर तालुक्यात १ हजार ३७४, पूर्णा तालुक्यात १ हजार १८३ व सेलू तालुक्यात ९५७ रुग्ण आढळले. तसेच मे महिन्यात परभणी तालुक्यात १ हजार ८९४, सेलू तालुक्यात १ हजार ३३३, जिंतूर तालुक्यात १ हजार ७१ व पाथरीमध्ये ७५४ रुग्ण आढळले.
तीन दिवसांत ३८ रुग्ण
जून महिन्यात ९ तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांत केवळ ३८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यात ११, परभणी तालुक्यात ९, पाथरी तालुक्यात ७, गंगाखेड, सेलू, सोनपेठ येथे प्रत्येकी ३, तर पूर्णा व मानवतमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला, तर तीन दिवसांत पालम तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.