सहा हजार ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:54+5:302021-09-16T04:23:54+5:30
परभणी : जिल्ह्यात ५ हजार ९८४ ऊसतोड कामगार असून, शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी या कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. ...

सहा हजार ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र
परभणी : जिल्ह्यात ५ हजार ९८४ ऊसतोड कामगार असून, शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी या कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी केल्यानंतर या कामगारांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, सहायक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, समाज कल्याण आयुक्त सचिन कवले यांची उपस्थिती होती. गोयल म्हणाल्या, सर्व साखर कारखान्यांना पत्र देऊन कारखान्याचे मुकादम व त्यांच्या क्षेत्रात मागील ३ वर्षे सलग काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही ग्रामसेवकांनी करावी. सर्व कारखान्यांनी सप्टेंबरअखेरपर्यंत ऊसतोड कामगारांचे लसीकरण करुन घ्यावे, असे निर्देशही गोयल यांनी दिले.
जिल्ह्यात ५ हजार ९८४ ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांनी ओळखपत्र मिळण्यासाठीच्या फॉर्ममध्ये पूर्ण नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील आदी माहिती भरुन अर्ज ग्रामसेवकांकडे द्यावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त सचिन कवले यांनी केले.