सहा दिवसात नऊ गावांना कोरोनाने वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST2021-05-07T04:18:05+5:302021-05-07T04:18:05+5:30
परभणी : ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ९ गावांमध्ये केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण ...

सहा दिवसात नऊ गावांना कोरोनाने वेढले
परभणी : ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ९ गावांमध्ये केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या साडेपाच हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना ग्रामस्थांनी मात्र आपले गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु हा संसर्ग इतका झपाट्याने वाढत आहे की, गावेच्या गावे कोरोनाबाधित होत आहेत.
जिल्ह्यात एकूण ८४८ गावे असून, २७ एप्रिल रोजी त्यातील ६३९ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली होती. एप्रिल महिन्यापर्यंत २०९ गावांनी स्वतःला कोरोनापासून दूर ठेवण्यात यश मिळविले. केवळ ६ दिवसांत ३ मे रोजी ६४८ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या २०९ गावांमधील ९ गावात केवळ सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण नोंद झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी २०० गावांनी कोरोनाला वेशीबाहेर ठेवले असून, यापुढे तरी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी या २०० गावांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
९० गावात दहापेक्षा अधिक रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ६४८ गावांपैकी ९० गावांमध्ये १० व त्यापेक्षा अधिक बाधित रुग्णांची संख्या आहे. परभणी तालुक्यातील सर्वाधिक २३ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण आहेत, तर पूर्णा आणि जिंतूर या तालुक्यात प्रत्येकी १५ गावांमध्ये कोरोना संसर्ग वाढला आहे. सेलू तालुक्यातील १० गावांत बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे.
सहा दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू
२७ एप्रिल रोजी ग्रामीण भागात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १२६ होती. ३ मे रोजी ही संख्या १३८ झाली. सहा दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३ मेपर्यंत परभणी तालुक्यात सर्वाधिक २७ रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले, तर गंगाखेड तालुक्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २२ एवढी आहे. पाथरी तालुक्यात १६, पूर्णा १५, जिंतूर १८, मानवत १२, पालम ११, सेलू १५ आणि सोनपेठ तालुक्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
५ हजार ७०० रुग्णांवर उपचार
ग्रामीण भागात सध्या ५ हजार ७०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. या रुग्णांवर परभणी शहरातील रुग्णालय तसेच गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक १ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहेत. पाथरी ३१२, पूर्णा ७५८, जिंतूर ९२२, गंगाखेड ४३६, मानवत ३४७, पालम २७३, सेलू ६१९ आणि सोनपेठ तालुक्यात २९९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
तालुकानिहाय बाधित गावे
परभणी ११४
पाथरी ४७
पूर्णा ७५
जिंतूर ११४
गंगाखेड ८२
मानवत ४३
पालम ५९
सेलू ७७
सोनपेठ ३७