नळजोडण्यांच्या नावाखाली रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:18+5:302021-02-05T06:06:18+5:30
परभणी : नवीन नळजोडण्या देण्याच्या नावाखाली खड्डे पाडून महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण केली जात आहे. विशेष म्हणजे, नव्याने ...

नळजोडण्यांच्या नावाखाली रस्त्यांची चाळण
परभणी : नवीन नळजोडण्या देण्याच्या नावाखाली खड्डे पाडून महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण केली जात आहे. विशेष म्हणजे, नव्याने तयार केलेले रस्ते मनमानी पद्धतीने फोडल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील सर्वच भागांत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली आहे.
शहरातील विद्यानगर, नाथनगर, नांदखेडा रोड या भागांत सहा ते आठ महिन्यांपूर्वी तयार केलेले रस्ते नवीन नळजोडणी देण्यासाठी मनमानी पद्धतीने फोडण्यात आले. अनेकांना रस्त्याच्या पलीकडील बाजूने नळजोडणी घ्यावी लागते. शहरातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झाली आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर खोदकाम करताना महानगरपालिका प्रशासनाने थोडा विचार करणे आवश्यक होते. नांदखेडा रस्त्यावर १५ फुटांच्या अंतरावर पाच ठिकाणी रस्त्यावर आडवे खोदकाम करण्यात आले आहे. १५ फुटांच्या अंतरात पाच ठिकाणी रस्ता फोडण्याऐवजी एकाच ठिकाणी रस्ता आडवा खोदून पलीकडील बाजूने पाच नळजोडण्या देणे शक्य होते. मात्र महापालिकेच्या प्रशासनावर कोणाचाही अंंकुश नसल्याने रस्त्यांची चाळण करण्याचे धोरण सध्या राबविले जात आहे. शहरातील इतर भागांतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्ते खराब करण्याच्या महापालिकेच्या या कार्यपद्धतीला लगाम घालावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, नारायण ढगे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, इरफान बेग, बाळा नरवाडे, सखाराम पावडे, आदींनी केली आहे.