दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:13+5:302021-06-27T04:13:13+5:30
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण राज्यात विविध ठिकाणी आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाच्या ...

दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण राज्यात विविध ठिकाणी आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी, कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी याबाबत आदेश काढला आहे. त्यानुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार व रविवार ही दुकाने बंद राहतील. रेस्टॉरंट पाच दिवस ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सुटीच्या दिवशी फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सर्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरण्यास सकाळी ५ ते ९ पर्यंतच परवानगी राहणार आहे. शासकीय कार्यालयासहित इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती ५० टक्केच सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, विविध बैठका, सभा यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी आहे. लग्न समारंभास फक्त ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असून अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी आहे. कृषी व कृषीपूरक सेवा आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर यांना ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच खासगी ट्रॅव्हल्स यांना ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिनेमागृह व नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश आहेत. खेळाची मैदाने पाच दिवस सकाळी ५ ते ९ पर्यंत आणि सायंकाळी ६ ते ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार व रविवार ही मैदाने बंद राहणार आहेत. त्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा आहे, त्या ठिकाणची बांधकामे दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ५ ते सकाळी ६ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नियमित काय सुरू...
सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दूध विक्री केंद्रे, दूध संकलन केंद्र, दूध वितरण केंद्र सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसेच खासगी वाहने, टॅक्सी, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांना आंतरजिल्हा प्रवेश यास परवानगी आहे; परंतु स्तर पाचमधून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना ई-पास बंधनकारक राहणार आहे. कोविड नियमांचे पालन करून एमआयडीसी पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.