धक्कादायक; जिल्ह्यात कोरोनाने २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:50+5:302021-04-15T04:16:50+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० ...

धक्कादायक; जिल्ह्यात कोरोनाने २१ जणांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने मोठी धास्ती निर्माण केली असून, बुधवारी १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली असून, २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूही वाढले आहेत. दररोज १० ते १५ रुग्णांचे मृत्यू होत आहेत. १४ एप्रिल रोजी सर्वाधिक २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शासकीय रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला असून, खासगी रुग्णालयातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला १४ एप्रिल रोजी ३ हजार १५८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या २ हजार ४१९ अहवालांमध्ये ८८८ आणि रॅपिड ॲन्टिजेन टेस्टच्या ७३९ अहवालांमध्ये २८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ८२६ झाली असून, त्यातील १६ हजार ९५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५७९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार २९३ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात १४०, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२८, अक्षदा मंगल कार्यालयात १३२ आणि होम आयसोलेशनमध्ये ४ हजार १११ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
५२७ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात बुधवारी ५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. आतापर्यंत सर्वाधिक ५२७ रुग्ण एका दिवसात कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.